डॉ. आशीष देशमुख
श्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आहेत. आरएसएसचे स्वयंसेवक म्हणून काम केल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी पहिल्यांदा नगरसेवक, १९९७ साली महाराष्ट्राचे सर्वात तरुण महापौर, १९९९ ला पहिल्यांदा आमदार, २०१४ साली पहिल्यांदा मुख्यमंत्री, २०१९ ते २०२२ विधानसभेत विरोधी पक्ष नेते, जून २०२२ ते नोव्हेंबर २०२४ उपमुख्यमंत्री असा देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास. आता पुन्हा २०२४ मध्ये ते राज्याचे मुख्यमंत्री होत आहेत, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन…!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला जबरदस्त फटका बसला. कारण महाविकास आघाडीने, भाजपा संविधान बदलणार, ४०० पार जागा मिळाल्या तर मुस्लीम आणि दलितांना धोका आहे, असा प्रचार केला होता. या प्रचारामुळे महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. महायुतीचे फक्त १७ खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. भाजपाच्या २२ खासदारांची संख्या थेट ९ वर आली. देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारीही दाखवली. मात्र केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस जोमाने कामाला लागले. लोकसभा निकालाची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कुशलतेने रणनीती आखली आणि ते रणांगणात उतरले. महायुती सरकारच्या कामांचा धडाक्याने प्रचार करीत कामाच्या आधारावर जनतेकडे कौल मागितला. त्यांची रणनीती यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. महायुतीचा विजय हा फडणवीस नामक योद्ध्याचा विजय आहे, यात शंका नाही; ज्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसला.
‘मैं समंदर हूँ लौटकर जरुर आऊंगा’, हे देवेंद्र फडणवीस यांचे शब्द महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरे ठरले. १३२ जागांवर भाजपाचे आमदार विजयी झाले. तर महायुतीला २३९ जागांवर प्रचंड यश मिळालं. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. या निवडणुकीच्या प्रचाराचे पाच महिने होते, त्यात देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने टार्गेट करण्यात आलं. मनोज जरांगे यांनीही मराठा आरक्षण न देण्यासाठी फडणवीस कसे जबाबदार आहेत हे सातत्याने सांगितलं, अगदी त्यांना शिवीगाळही केली. नंतर माफीही मागितली. पण प्रत्येकाच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस होते. एक तर तू राहशील किंवा मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचं वाक्य देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून होतं. संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना खलनायक, महाराष्ट्राचे अनाजीपंत, महाराष्ट्रात डर्टी पॉलिटिक्स आणणारे नेते, महाराष्ट्राचा कलंक, असं म्हणत राहिले. तर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना निवडणुकीत पाडण्याचं आवाहन केलं. नाना पटोले तर फडणवीसांविरोधात काय वाट्टेल ते बोलत होतेच. सगळ्यांनी टार्गेट करुनही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याऐवजी विकासकामं आणि जनतेशी संवाद सुरु ठेवला. प्रचाराची भाषणं करताना ९५ टक्के विकास आणि पाच टक्के आरोपांना उत्तर, असं सूत्र ठेवलं. त्याचा परिणाम समोर आला आहे. देवेंद्र फडणवीस नावाचा आधुनिक नेता सगळे चक्रव्यूह भेदून बाहेर आला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री म्हणून ते जेव्हा पुन्हा आले, तेव्हा अनेकांची बोलती बंद करुन आणि गपगार करुन आलेत, यात शंकाच नाही.
पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीला मिळालेला महाविजय फक्त भाजपा-महायुतीचा नाही, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांच्या विश्वासाचा आहे. नागरिकांनी दाखवलेल्या या विश्वासासाठी आणि दिलेल्या प्रेमाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेपुढे मी नतमस्तक होतो, असे भावनिक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नम्रपणे केले.
विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेक अर्थांनी वेगळा व संस्मरणीय ठरतो. साडेपाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने पूर्णपणे फिरले आहे आणि या निकालाच्या आधारे विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धुव्वा उडणार, अशी हवा तयार केली गेली. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी महायुतीला स्पष्टपणे नाकारले नव्हते, हे विशेष.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अनेक कंगोरे होते. त्या निकालाचा महाविकास आघाडीने विशेषत: ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सोयीस्कर अर्थ काढत महायुतीला मतदारांनी झिडकारले, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या निकालानंतर महाराष्ट्रात आपली सत्ता आलीच, अशा आविर्भावात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नेते वावरत होते. या सर्वांना मतदारांनी सणसणीत चपराक दिली.
खऱ्या कर्णधाराची, नायकाची कसोटी कठीण प्रसंगात लागत असते. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रतिकूल वातावरणाचा संधी म्हणून वापर करीत प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीला एकहाती लोळवले. या निवडणुकीत फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होणार, अशी स्वप्ने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना दिवसाढवळ्या पडू लागली होती. या सर्वांना देवेंद्र फडणवीस पुरून उरले.
विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून झालेल्या विश्वासघातावर कडाडून टीका करणे सुरू केले होते. त्या वेळी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही केवळ उद्धव ठाकरे यांच्या विश्वासघातामुळे देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होता आले नाही. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर फडणवीस यांच्या पुढे संघटनेचे मनोबल टिकवण्याचे आणि कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज करण्याचे मोठे आव्हान होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे बारकाईने विश्लेषण करून महायुती आणि महाविकास आघाडीतील मतांचा फरक अवघ्या पाऊण टक्क्यांचा आहे, हे दाखवून दिले होते. महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा फक्त दोन लाख मते अधिक मिळाली आहेत, हे दाखवून देत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दावे खोडून काढले होते.
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाचा खोटा प्रचार, मुस्लिम समाजात निर्माण केलेला भयगंड / सीएएची भीती यामुळे महाविकास आघाडीला अधिक जागा मिळाल्या होत्या. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी काय करावे लागेल, याची रणनीती कुशलतेने तयार करत देवेंद्र फडणवीस रणांगणात उतरले होते. फडणवीस यांनी स्वतः तयार केलेल्या खेळपट्टीवर महाविकास आघाडीला खेळायला लावले. भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची त्यांना चांगली साथ मिळाली.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या व्होट जिहादची पुनरावृत्ती करण्यासाठी उलेमा बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी जातीने मैदानात उतरले होते. उलेमा बोर्डाकडून महाविकास आघाडीला अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वणी देवस्थानासह महाराष्ट्रातल्या अनेक सार्वजनिक जागा वक्फ बोर्डाच्या नावे कराव्यात, मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे, दंगलीतील मुस्लिम आरोपींवरचे खटले रद्द करावेत आदी मागण्या या नोमानी महाशयांनी केल्या होत्या. या फतव्याच्या राजकारणाच्या संकटामुळे महाराष्ट्रावर आणि संपूर्ण देशावर होणाऱ्या भयावह परिणामांची जाणीव करून देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
लोकसभा निवडणुकीत संघटना पातळीवर ज्या त्रुटी राहिल्या होत्या, त्या दूर करून फडणवीस यांनी महायुती सरकारच्या कामांचा धडाक्याने प्रचार करत कामांच्या आधारावर जनतेकडे कौल मागितला. सर्वांगीण विकास, विकासाची दूरदृष्टी आणि सकारात्मक भविष्याकडे वाटचाल ही त्यांची रणनीती पूर्णपणे यशस्वी ठरली, हे सिद्ध झाले. लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, लखपती दीदी, एका रुपयात पिक विमा, शेतकरी सन्मान निधी, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विजबिल माफी, शेतमालासाठी भावांतर योजना अशा अनेक योजना त्यांनी प्रचारमाध्यमातून नागरिकांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचविल्या. समृद्धी महामार्ग असो, जलयुक्त शिवार असो, मुंबई येथील कोस्टल रोड असो, अटल सेतू असो सर्वच स्तरांवर त्यांनी भरीव काम केलेले आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, मोठे नवे उद्योगधंदे आणून ते मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करतील. शेतकऱ्यांसाठी वीजेच्या दृष्टीने सोलर फिडर योजना, वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे सिंचनाचा प्रश्न ते मार्गी लावतील. महाराष्ट्राला देशातील पहिल्या नंबरचं राज्य बनवतील, असा विश्वास सर्वाना आहे. त्या विश्वासाने महायुतीला मोठी साथ दिली.
महायुतीचा विजय हा फडणवीस नामक सेनापतीचा विजय आहे. आपल्यावरील टीकेला आपल्या कृतीने प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने अनेक आव्हानांच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली. २०२४ चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे नव्या युगाचे बलाढ्य नेते आहेत, हे सर्वांना मान्य करावेच लागेल. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र यशाची नवी शिखरे गाठेल, या खात्रीसह देवेंद्रजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा.
-डॉ. आशीष देशमुख
आमदार (भाजपा-महायुती),
सावनेर-कळमेश्वर विधानसभा क्षेत्र,
जि.नागपूर (महाराष्ट्र)
मो. 9822233000
ई-मेल: d_ashish@hotmail.com