सामाजिक चळवळीतील बुलंद आवाज हरपला- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
69

शिवसंग्राम व मेटे परिवाराच्या सदैव सोबत … उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

बीड : शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. विनायकरावजी मेटे यांच्या अपघाती निधनानंतर शिवसंग्रामच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी नरिमन पॉईंट , मुंबई येथे शोकसभेचे आयोजन केले. या शोकसभेसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे , उपमुख्यमंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस माजीमंत्री तथा आ. धनंजय मुंडे, मा.ना.मंगलप्रभात लोढा, राज्यसभा सदस्य रजनीताई पाटील, मा.आ.अशोक चव्हाण, मा.आ. बाळासाहेब थोरात, मा.आ. नाना पटोले, आमदार धनंजय मुंडे, आमदार डॉ.भारती लव्हेकर, आमदार श्वेता महाले, आमदार मंदा म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील, शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, स्व.विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे, कन्या आकांक्षा तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, शिवसंग्राम संघटनेचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

या शोकसभेत स्व. विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली अर्पित करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज हरपला तथा अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता महाराष्ट्राने गमावला अशा शब्दात श्रद्धांजली अर्पित केली. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांना श्रद्धांजली अर्पित करताना त्यांच्या आरंभीच्या जीवन कार्यापासून ते आजतायागत सामाजिक व राजकीय कार्यावर प्रकाश टाकला. यामध्ये त्यांनी म्हटले की स्वर्गीय विनायकराव मेटे यांचे आणि माझे मैत्रीपूर्ण संबंध होते. स्व. मेटे साहेब माझी आवर्जून भेट घ्यायचे, संपर्कात असायचे . तसेच आरंभीच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हटले सलग पंचवीस वर्ष आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले विशेष करून अधिवेशनामध्ये त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असायचे . विधानसभा आणि विधानभवनातील सर्व आमदार त्यांचे भाषण लक्ष देऊन ऐकत असत . याचे महत्त्वाचे कारण असे की ते बोलताना एक अभ्यासपूर्ण मत मांडायचे आणि अत्यावश्यक, गरज वा बाब कोणती ? यावर ते प्रकाश टाकायचे . विधान परिषदेवर सदस्य म्हणून जाण्यापूर्वी त्यांनी रोजंदारीवर काम केलं . असा काम करणारा महाराष्ट्रातील पहिलाच आमदार म्हणजे विनायकराव मेटे हे आहेत . ते एक विस्थापित कुटुंबातील असल्यामुळे त्यांना हमाली, वेटर, रंगारी, भाजीपाला विकणे असे मिळेल ते काम करत – करत समाजकारणाला ते वेळ देत असत . त्यांनी मंत्रालय शेजारील बहुतांशी इमारतीना रंग देण्याचे काम केले परंतु रंग देणारा कामगार एक आमदार झाला असं स्वकर्तृत्वान नेतृत्व म्हणजे स्वर्गीय विनायकराव मेटे हे होय.ज्या दिवशी विधान परिषदेची सदस्यत्वाची त्यांना शपथ घ्यावयाची होती त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की मी आमदार होणार आहे तुम्ही मंत्रालयात चला परंतु त्यांच्या या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही परंतु तत्कालीन वर्तमानपत्र “नवाकाळ ” यामध्ये ज्यावेळेस विनायकराव मेटे हे आमदार झाले याची बातमी छापून आली . त्यावेळेस मात्र या सर्वांना खरे वाटले व खूप आनंद झाला . त्यांनी आरंभीच्या काळामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचे काम केलं . महाराष्ट्र विकास पार्टी मध्ये काम केलं . तसेच 2001 मध्ये शिवसंग्राम संघटना स्थापन केली आणि आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्ते व पदाधिकारी असणारी एकमेव सक्रिय संघटना म्हणजे शिवसंग्राम ही होय . स्वर्गीय मेटे साहेबांनी व्यसनमुक्तीसाठी 31 डिसेंबर रोजी मेळाव्याचे आयोजन करत असत . यामध्ये हजारो तरुणांना निर्व्यसनी बनवले व व्यसनापासून दूर नेण्याचे काम त्यांनी केलं . अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं व युगे -युगे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देत राहील . ही संकल्पना सुद्धा स्वर्गीय विनायकराव मेटे यांची असून आगामी काळात हे स्मारक पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार . अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तसेच पुढे बोलताना म्हटले की अजित बालक सुरक्षा योजनेमध्ये शिरूर कासार हा बीड जिल्ह्यातील तालुका त्यांनी दत्तक घेतला आणि यामध्ये लक्षपूर्वक काम करून ही योजना यशस्वी करून दाखवली . तसेच त्यांनी उत्तरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली . तुकाराम रुलर ह्युमन अँड चॅरिटेबल ट्रस्ट , मराठवाडा लोकविकास मंच , तसेच भारतीय लोकविकास संस्था , लोकविकास सहकारी बँक , उत्तरेश्वर नागरी पतसंस्था , मजूर संस्था , सेवा सहकारी संस्था , दूध संस्था स्थापन करून समाजामध्ये सहकाराचं जाळ उभा केलं . त्यांनी मराठवाडा भूषण पुरस्कार चालू केला यामध्ये स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेब तसेच माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख व विविध क्षेत्रांमध्ये अतुलनिय काम करणाऱ्या व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने सन्मानित केलं . 15 सप्टेंबर 2022 रोजी चा पुरस्कार हा देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यासाठी त्यांनी घोषणा केली होती परंतु आज ते आपल्यात नाहीत याचे खूप दुःख होत आहे . सामाजिक लढ्यामध्ये गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी त्यांनी खूप मोठा लढा उभा केला . हा लढा देत असताना त्यांनी प्रत्येक वेळी अपयश आलं तेव्हा स्वतःहून बारकाईने संविधानाचा अभ्यास करायचे, विशेष करून सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द झालं त्यावेळेस शिवसंग्रामने हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.महाराष्ट्रभरातील सर्व कार्यकर्ते आणि शिवसंग्राम संघटना हा त्यांचा मोठा परिवार होता . स्वर्गीय मेटे साहेबांचे प्रत्येक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तीशी जिव्हाळ्याचे सबंध होते . 14 ऑगस्ट 2022 रोजी मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला येत असताना काळाने घाला घातला आणि दुर्दैवाने त्यांच्या गाडीला अपघात झाला आणि यामध्ये ते आपणा सर्वांना सोडून गेले .स्वर्गीय विनायकरावजी मेटे यांचे स्वप्न पूर्णत्वास नेऊ व जेव्हा त्यांचे मराठा आरक्षण व अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा पूर्ण होईल तीच खरी स्वर्गीय विनायकराव मेटे यांना श्रद्धांजली असेल असे भावनिक गौरवउद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काढले . याप्रसंगी उपस्थित मा.ना.मंगलप्रभात लोढा, राज्यसभा सदस्य रजनी पाटील, आमदार अशोक चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार नाना पटोले, आमदार धनंजय मुंडे, आमदार डॉ.भारती लव्हेकर, आमदार श्वेता महाले, आमदार मंदा म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नरेंद्र पाटील, शिवसंग्रामचे अध्यक्ष तानाजी शिंदे, सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योतीताई मेटे, कन्या आकांक्षा, विविध राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर, शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here