गोगलगायीनी पीडलेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या – धनंजय मुंडेंनी वेधले सरकारचे लक्ष

0
66

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 5 जनांची समिती अभ्यास करून नुकसानीचा अहवाल राज्य शासनास देणार, त्यानुसार मदतीचे कृषी मंत्र्यांचे आश्वासन

मुंबई – बीड, लातूर व उस्मानाबाद यासह काही जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे गोगलगायिनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तीन-चार वेळा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पीकही हाती लागले नाही, अशा शेतकऱ्यांना कपाशी वर पडलेल्या बोंड अळीवर ज्याप्रमाणे विशेष मदत देण्यात आली, त्याप्रमाणे गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची गरज आहे, झालेल्या नुकसानीची दाहकता व प्रमाण पाहता राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नुकत्याच जाहीर केलेल्या एन डी आर एफच्या निकषांप्रमाणे मदतीच्या तिप्पट मदत देण्यात यावी, अशी लक्षवेधी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत मांडून सरकारचे लक्ष वेधले.

या लक्षवेधीवर राज्य सरकारच्या वतीने कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, सदर नुकसानीची माहिती राज्य शासनास पूर्णपणे प्राप्त व्हावी यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ शास्त्रज्ञ व अभ्यासक अशा 5 अधिकाऱ्यांची समिती नेमून गोगलगायीनी केलेल्या नुकसानीचा अभ्यास व पडताळणी करून अहवाल मागवला जाईल; या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे कृषी मंत्री सत्तार म्हणाले.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात सुमारे 4 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रात गोगलगायीनी उगवलेले सोयाबीन खाऊन टाकले. वारंवार शेतकरी गोगलगायी गोळा करून त्यांवर मीठ टाकून त्यांना नष्ट करत मात्र, पुन्हा पेरणी केली ती तीच परिस्थिती.

यामुळे तीन-चार पेरण्या करूनही गोगलगायीचे नियंत्रण नाही आणि पिकही हाती लागणार नाही, अशी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली असल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याआधीही त्यांनी तीन वेळा राज्य शासनाकडे याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती.

त्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी विधानसभेत हा विषय लक्षवेधी द्वारे मांडल्यानंतर कृषी मंत्र्यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत, अभ्यास समिती नेमून आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here