मुंबई : भारतीय जनता पार्टीचे गटनेता म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर महायुतीतर्फे बुधवारी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला. राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण दिल्यानंतर आज गुरुवारी राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस मुंबईच्या आझाद मैदानावर आयोजित महासोहळ्यात शपथ घेणार आहे. देवेंद्र 3.0 पर्वाला आजपासून सुरुवात होणार आहे.
विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटप होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आजच देवेंद्र फडणवीस तातडीने कॅबिनेटची पहिली बैठक घेणार असून कामाचा धडाका लावणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पहिल्या बैठकीत ते कुठले मोठे निर्णय घेतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. महायुतीतील दुसरा सहकारी पक्ष शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे शपथ घेतील की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम होता. मात्र, शिंदे हे सुद्धा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याची माहिती समोर येत आहे. याव्यतिरिक्त तीनही पक्षातील कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेतील, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
शपथविधीसोहळ्याची जय्यत तयारी
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला 19 राज्याचे मुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत. 2000 व्हीव्हीआयपींची मांदियाळी राहणार आहे. सुमारे 10 हजार लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. तब्बल 40 हजार लोक एकत्र बसतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण व्यवस्थेत भगव्या रंगाचे प्राबल्य राहणार आहे.
आझाद मैदानात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शपथविधी समारंभाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेता 1500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे.
वजीर ऑनलाईन यू ट्यूब चॅनलवर थेट प्रक्षेपण
महाराष्ट्र सरकारच्या शपथविधी महासोहळ्याचे थेट प्रक्षेपण WAZIR Online या यू ट्यूब चॅनलवर दुपारी 4 वाजतापासून करण्यात येणार आहे.