पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे.
मुंबई (Mumbai) : शरद पवार (Sharad Pawar) कृषीमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना उपस्थित केला होता. यानंतर राजकीय वर्तुळातून उलट सुलट प्रतिक्रिया येऊ लागल्या. कधीकाळी शरद पवार यांचे तोंड भरुन कौतुक करणारे पंतप्रधान शरद पवारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसले. दरम्यान शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधानांना उत्तर दिले.
पंतप्रधान मोदींनी कृषी खाते कारभार यावर काही मुद्दे मांडले. पंतप्रधान हे पद हे इन्स्टिट्यूट आहे. त्या पदाचा मान राखत भूमिका मांडत असल्याचे पवारांनी सुरुवातीला स्पष्ट केले.
शरद पवार म्हणाले, पंतप्रधान हे संविधानिक पद आहे. पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे. सन २००४ ते २०१४ या काळात मी कृषीमंत्री म्हणून काम केलं. कृषीमंत्री पदाचा स्वीकार केला तेव्हा अन्नधान्याचा तुटवडा होता. अमेरिकेतून गहू आयात करण्याचा निर्णय मी प्राधान्याने घेतला. मोदींनी दिलेली माहिती वास्तवापासून दूर आहे. मी कृषी क्षेत्रात अनेक नव्या योजना सुरु केल्या. एकेकाळी आयात करणारा देश निर्यात करणारा देश झाला. मी ६२ हजार कोटींची कर्जमाफी कऱण्याचा मोठा निर्णय घेतला. मी कृषीमंत्री असताना देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला, असेही ते म्हणाले.