चंद्रपूर (chandrapur) : स्व. खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा (loksabha) मतदार संघावर काँग्रेस पक्षाकडून पहिला हक्क आमदार प्रतिभा धानोरकर (pratibha dhanorkar) यांचा आहे. काँग्रेस नेत्यालाच या मतदार संघातून उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे (subhash dhote) यांनी केली आहे. माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) व आमदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही सोबत घेवून चालणार असल्याचेही धोटे म्हणाले.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह संयुक्त पत्रपरिषद घेतली. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. धोटे म्हणाले, शहर तथा ग्रामीण भागात काँग्रेसची ध्येयधोरणे तथा पक्षाचे काम प्रामाणिकपणे पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. पक्षवाढीसाठी लवकरच चंद्रपुरात काँग्रेसचा मेळावा घेणार आहे. या मेळाव्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नेते मंडळी तथा प्रदेश स्तरावरील नेत्यांना पाचारण करणार आहे.
वडेट्टीवार पालकमंत्री असताना जिल्हा विकास व नियोजनच्या बैठकीत काँग्रेसच्या दोन्ही आमदारांना सावत्र वागणूक देत होते. राजुरा व भद्रावती-वरोरा विधानसभा मतदारा संघासाठी निधीच देत नव्हते. वडेट्टीवार धोटे-धानोरकर यांच्यामुळेच मंत्री झाल्याचे आपण त्यांना सांगितले. आता विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील निधी देत नाही, अशी तक्रार धोटे यांनी केली. मुनगंटीवार संकुचित भावना ठेवून काम करीत आहेत. हा प्रकार योग्य नाही, असे धोटे म्हणाले.