शेतकरी संघटित झाल्याशिवाय त्यांच्या समस्या सुटणार नाहीत – अँड. अजित देशमुख

0
44

 

निल्लोड (प्रतिनिधी) सध्या शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मराठवाडा पाण्यासाठी मागासलेला विभाग आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. मात्र त्यावर योग्य तोडगा काढल्या जात नाही. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त आहे. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यात मार्ग काढायचा असेल तर शेतकरी संघटित होणे आवश्यक आहे. तो संघटित झाल्याशिवाय त्यांच्या समस्या सुटणार नाहीत, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाज सेवक मा. अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे विश्वस्त अजित एम. देशमुख यांनी केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील निल्लोड या गावी आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी सांडूजीराव कराळे गुरुजी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जायभाय, तालुका अध्यक्ष जी. टी. वाघ, जिल्हा सचिव प्राध्यापक ज्ञानेश्वर गोराडे हे होते.

याप्रसंगी बोलताना अँड. अजित देशमुख म्हणाले की, पिक कर्ज असो की, पिक विमा याबाबतीत शेतकऱ्यांना योग्य तो न्याय कधीच मिळत नाही. वेळेवर आणि आवश्यक तेवढे कर्ज दिले जात नसल्याने पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होतात. तर दुसरीकडे नुकसान झाल्यानंतर देखील पिक विमा मिळत नाही. यासाठी लोक प्रतिनिधी आवाज उठवत नाहीत. याच कारणामुळे महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र पेक्षा मराठवाडा मागासलेला आहे.

मराठवाड्यातील लोक प्रतिनिधींची मानसिकता बदलने देखील गरजेचे आहे. विकासासाठी भांडणे आवश्यक असताना मराठवाड्यातील नेते मराठवाड्याच्या विकासासाठी सातत्यपूर्ण रितीने भांडत नाहीत. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या भागातील लोक प्रतिनिधी अपयशी ठरलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात मुबलक पाणी आहे. त्यामुळे तेथे विकास साध्य झालेला आहे. मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेती थांबवून आधुनिक शेतकरी म्हणून पुढे येत नसल्याने देखील पाण्याच्या मोठ्या समस्या उपस्थित होत आहेत.

मराठवाड्यात सामुदायिक रीतीने आंदोलने झाली, तर येथील प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागतील. यासाठी शेतकरी वर्ग एकत्र होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही झेंड्याखाली एकत्र न येता विकासाच्या मुद्द्यावर स्वतःच्या गावात स्वतःच आंदोलने उभी केली पाहिजेत. शेतकऱ्यांचा आता कोणत्याच झेंड्यावर अथवा पक्षावर विश्वास राहिलेला नाही. आणि वेगवेगळ्या पक्षांनी त्यांचेवर विश्वास राहू नये, असे कृत्य केलेले असल्यामुळे शेतकरी संघटित होत नाही.

विकास साध्य करायचा असेल तर शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. आपापल्या गावात शेतकरी संघटित झाला आणि पुढाऱ्यांना जाब विचारला, तरी देखील त्या गावाचे प्रश्न मार्गी लागतील. अन्यथा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढीसाठी लोकप्रतिनिधी इतकेच शेतकरी देखील जबाबदार राहतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी संघटित होणे ही काळाची गरज झाली आहे. जोपर्यंत शेतकरी संघटित होत नाही, तोपर्यंत त्यांच्या प्रश्नाला वाचा फुटणार नाही, असे देखील अँड. देशमुख यांनी म्हटले.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातर्फे स्वातंत्र्य सेनानी सांडूजीराव कराळे गुरुजी यांच्या सत्त्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करत असल्याबाबत अभिष्टचिंतन सोहळ्याचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार विजय राठोड, पोलीस निरीक्षक श्रीमती आरती जाधव, गावातील शाळांचे मुख्याध्यापक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मॅनेजर, त्याचप्रमाणे सरपंच, उप सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक त्याचप्रमाणे जन आंदोलनाचे कार्यकर्ते हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. टी. वाघ यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्राध्यापक ज्ञानेश्वर गोराडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here