आज सकाळपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येत होत्या. औरंगाबादेतील सभेप्रकरणी राज ठाकरेंवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पोलिसांनी राज ठाकरेंचं सगळं भाषण तपासल्यानंतर अखेर दुपारच्या सुमारास राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गर्दीचा नियम मोडला, आवाजाची मर्यादा ओलांडली
1 मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादेत जाहीर सभा घेतली होती. या सभेत त्यांनी भडकाऊ भाषण केल्याचा आरोप आहे. तसेच, त्यांना आवाजाची मर्यादा घालून दिली होती, ती मर्यादा त्यांनी ओलांडली. गर्दीचा नियमही त्यांनी मोडला. यासर्व प्रकरणी त्यांच्यावर औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल दिवसभर औरंगाबादच्या डीसीपींनी सायबर सेलमध्ये बसून राज ठाकरेंच्या भाषणाचे सर्व फुटेज तपासलं. त्याचा निष्कर्ष गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला होता. गृहमंत्रालयात चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार, औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.