वणी : वणी येथील एक्सिस बँकेतील व्यवस्थापकाच्या सतर्कतेमुळे एटीएम फोडणारी टोळी जेरबंद झाली. वणी पोलिसांनी ही कारवाई केली.
वणी येथील खाती चौकात ॲक्सिस बँकेची शाखा आहे. या बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे आहेत. गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तींकडून शहरातील एटीएम फोडण्याचे प्रकार वाढले असल्याची बाब श्री. ठाकरे यांच्या लक्षात आली. बहुतांश एटीएम बँकेला लागून आहेत. काही एटीएम बँकेपासून दूर आहेत. सुटीचा दिवस बघून चोरटे डाव साधतात, हे सुद्धा ठाकरे यांनी हेरले. एक्सिस बँकेला लागूनच एटीएमसुद्धा आहे. ॲक्सिस बँकेच्या एटीएमवरसुद्धा चोरटे डल्ला मारू शकतात, हे हेरून बँकेचे व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांनी बँकेसमोरील एका हॉटेल चालकाशी चर्चा केली. एटीएमसमोर कुणीही संशयास्पद स्थितीत आढळून आल्यास तातडीने आपल्याला कळविण्याची विनंती त्यांनी केली.
दरम्यान, शुक्रवार 13 डिसेंबरला रात्री 9.30 वाजता एक्सिस बँकेच्या शटर जवळ दोन इसम संबंधित हॉटेल चालकाला संशयास्पद स्थितीत आढळले. त्या हॉटेलचालकाने तातडीने बँक व्यवस्थापक प्रकाश ठाकरे यांना याबाबत भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. ठाकरे यांनी तातडीने वणी पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी तातडीने एक्सिस बँकेचे एटीएम गाठले. तेथे दोघे जण लपून बसल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांना बघताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्यांना पकडले. चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. सचिन भाऊराव गिल्लोरकर (38), रा. डोंगरगांव, ता. हिंगणा, जिल्हा नागपूर आणि अपेक्ष राष्ट्रपाल गजभिये (24), राजीव नगर, वर्धा रोड, साईं मंदिर, नागपूर अशी संशयितांची नावे आहे.