: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित शपथविधी रविवारी (15 डिसेंबर) नागपूरमध्ये पार पडला. यावेळी 33 कॅबिनेट मंत्र्यांनी आणि 6 राज्यमंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली.
सोमवारपासून (16 डिसेंबर) महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनदेखील सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर रविवारचा शपथ सोहळा पर पडला.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला.
एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात काम केलेल्या अनेक मंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि रवींद्र चव्हाण नाहीत. तर एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेलं नाही.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपद मिळालेलं नाही.