नागपूर (Nagpr) दि. १७ : नागपूर जवळच्या बाजार गाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (Solar Industries India Limited) या ठिकाणी आज झालेल्या दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Dwevendra Fadnavis)यांनी सायंकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. उपस्थित कुटुंबीयांशी बोलताना या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आलेली आहे. कंपनीकडून सुद्धा 20 लाख रुपये मदत त्यांनी जाहीर केली आहे. या कुटुंबियांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
उपमुख्यमंत्री अजित पवार (Dept. CM Ajit Pawar) यांच्याकडूनही पाहणी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सायंकाळी सातच्या सुमारास बाजारगाव येथील दुर्घटनास्थळाला भेट दिली.
उपमुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) व उपस्थित अधिकाऱ्यांकडून दुर्घटनेची आणि मदतकार्याची माहिती घेतली. मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.
उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांचीही भेट घेऊन त्यांचेही सांत्वन केले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच स्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश दिले असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. स्फोटाची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त केल्या.