विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते महाआरती व महाकाली महोत्सवाचे उद्घाटन.
चंद्रपूर (Chandrapur) – चंद्रपूर हा राज्यातील शेवटच्या टोकावर असलेला जिल्हा असला तरी या जिल्हाची मोठी धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक ओळख आहे. हा वीज उत्पादक जिल्हा आहे. या जिल्ह्याशिवाय राज्यात लखलखाट होऊ शकत नाही. हा जिल्हा राज्याची ज्योत आहे. या जिल्ह्याने राज्याला प्रकाश दिला. त्यामुळे येथील प्रश्नांची दखल नक्कीच घेण्यात येणार असून चंद्रपूरच्या विकासासाठी येणा-या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले.
श्री महाकाली माता महोत्सव समितीच्या वतीने चंद्रपूरात आयोजित श्री माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधा पोटदुखे, मनिष महाराज, कल्यानी किशोर जोरगेवार, महाकाली माता महोत्सव समितीचे उपाध्यक्ष विजय मोगरे, सुनिल महाकाले, कोषाध्यक्ष पवण सराफ, सचिव अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, काँग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष रामू तिवारी, माजी नगरसेवक नंदु नागरकर, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधूसूदन रुंगठा, योग नृत्य परिवाराचे गोपाल मुंधडा, सराफा असोसिएशन अध्यक्ष राजेंद्र लोढा, डॉ. दाबेरे, मिलींद गंपावार, श्याम धोपटे, यंग चांदा ब्रिगेड च्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंडारे, सायली येरणे, युवा नेते अमोल शेंडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते माता महाकाली मंदिर समोरील 151 फुट उंचिच्या माता महाकाली महोत्सवाच्या ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले. त्यांनतर आयोजित चित्रकला स्पर्धेचेही त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या चित्रकला स्पर्धेत एक हजार हून अधिक शालेय विद्यार्थांनी सहभाग घेतला आहे. या प्रसंगी राहुल नार्वेकर यांच्या हस्ते माता महाकालीची महाआरती करण्यात आली.
या कार्यक्रमात बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले की, विमानतळा पासून ते महाकाली मंदिर पर्यंत सुंदर सजावट करण्यात आली आहे. मातेच्या भक्तांमध्ये उत्साह दिसत आहे. हा महोत्सव जणू चंद्रपूरकरांची दिवळीच असल्याचा प्रत्यय यातून येत आहे. सुरु केलेली ही प्रथा याच उत्साहात कायम ठेवा. मातेची कृपा सदैव आपल्यावर राहिल. चंद्रपूरचे माता महाकाली मंदिर हे देशातील सर्वाधिक प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. या पूरातन वास्तूचे जतन आपण केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडा पुर्वी पासूनचा इतिहास या वास्तूने अनुभवला आहे. आज भारत चंद्रावर पोहोचला आहे. जगातील 4 मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत समोर आला आहे. हे आपण आपल्या संस्कृतिचे जतन आणि पालन केल्यामुळेच शक्य झाले असल्याचे ते यावेळी म्हणाले. चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीचा विकास क्रमप्राप्त आहे. अधिवेशनाच्या पूर्वी आपण पाठपूरावा करुन येथे अपेक्षित असा विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. राहुल नार्वेकर यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी भेट देत आमदार जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अम्मा का टिफिन ची माहिती जाणून घेतली.
मातेची पालखी निघावी हे स्वप्न पूर्ण करता आल्याचा आनंद – आ. किशोर जोरगेवार
चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची पालखी निघावी हे स्पप्न होत. मागच्या वर्षी पासून आपण चंद्रपूरात माता महाकाली पालखीची सुरवात केली. हे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात महिलांचा जागर व्हावा या हेतूने आपण मागच्या वर्षी श्री माता महाकाली महोत्सवाला सुरवात केली होती. त्यावेळी नागरिकांचा मिळालेला सहभाग उत्साह वाढविणारा होता. त्याच उत्साहातून यंदा दुस-या वर्षीही आपण श्री माता महाकाली महोत्सवाचे भव्य आयोजन करु शकलो. या महोत्सवामुळे माता महाकालीची महती राज्यभरात पोहोचणार असून येथील पयर्टनालाही चालना मिळणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून चंद्रपूरातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व ऐतिहासिक महत्व राज्यात पोहोचणार असल्याचे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमात राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे आणि वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचेही भाषणे झालीत. यावेळी पद्श्री पुरस्कार प्राप्त परशुराम खुणे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पूष्पा पोडे, चंद्रयान मोहिमेत योगदान दिल्याबद्दल जॉर्ज जिजू, शरवरी गुंडावार, तर मानव वन्य जीव संघर्ष टाळण्यासाठी योगदान देणाऱ्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रगडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन प्रा श्याम हेडाऊ आणि अल्का ठाकरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मिलींद गंपावार यांनी केले.
सकाळी जैन मंदिरातून निघाली माता महाकालीच्या चांदीच्या मुर्तीची शोभायात्रा
सकाळी सात वाजता सराफा असोशिएशनच्या वतीने जैन मंदिर येथून माता महाकालीच्या चांदीच्या मुर्तीची शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा गांधी चौक होत आमदार किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी पोहोचली यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक माता महाकालीच्या मूर्तीची पूजा अर्चना केली. नंतर सदर शोभायात्रा महाकाली मंदिर परिसरात पोहचली. येथे या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.