व्यावसायिकांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी नुकसान भरपाई द्यावी.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मागणी.
नागपुरातील पूर नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रीत आणि गलथान कारभाराचे पाप.
मुंबई (Mumbai), दि. २४ सप्टेंबर २०२३
नागपूर (Nagpur) शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठले व पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपूरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच शहरातील हजारो दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य भिजल्याने हजारो व्यावसायिक संकटात सापडले आहेत. त्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून नुकसानीच्या तुलनेत सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी आहे. सत्ताधारा-यांच्या चुकीमुळे झालेल्या या नुकसानीची जबाबदारी घेऊन पंचनामे करून नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.
या संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की नागपूर शहरातील पूर परिस्थिती ही गेल्या काही वर्षातील नागपूर महानगरपालिका आणि राज्यातील विद्यमान भाजपा सरकारच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. नागपूर शहरातील दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब झाली आहेत व घरात मोठ्या प्रमाणात चिखल साठला आहे. हीच परिस्थिती शहरातील हजारो दुकानांची आहे अनेक दुकानांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली होती मात्र अचानक आलेल्या पुरामुळे दुकानात पाणी शिरलं आणि हा संपूर्ण माल खराब झाला. पण सरकारने रहिवाशांना प्रत्येकी १० हजार आणि दुकानदारांना ५० हजारापर्यंत पर्यंत मदत देण्याचं जाहीर केले आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान फार जास्तीचे आहे. या नुकसानीचे पंचनामे करून ज्याचे जेवढे नुकसान झाले आहे तेवढी भरपाई दिली पाहिजे कारण नागपुरातील पूर ही नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रीत आणि गलथान कारभाराचे पाप आहे.
स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dept. CM Devendra Fadnavis) यांनी विकासाच्या नावाखाली नागपूर शहरात आपल्या चेल्या चपाट्यांना आणि ठेकेदारांना जगविण्यासाठी काँक्रीटचे जंगल उभे केले. त्यामुळे शहराचा विकास होण्याऐवजी शहर बकाल झाले आहे. एका दिवसाच्या पावसाने देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या विकासाच्या पोकळ गप्पा, बोगस दावे आणि भाजपचा भ्रष्ट कारभार उघडा पडला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.