६५ कोटींच्या योजनेचा गेवराईकरांना हिशोब द्या आणि नंतर गढीच्या योजनेची तक्रार करा

0
30

गढीचे उपसरपंच मंगेश कांबळे यांचे आ. लक्ष्मण पवारांना जाहिर आवाहन

गेवराई प्रतिनिधी :  बोगस कामामुळे सुमारे ६५ कोटी रुपये खर्च करूनही पैठण-गेवराई पाणीपुरवठा योजना यशस्वी झाली नाही, निकृष्ट दर्जाचे पाईप वापरल्यामुळे ठिकठिकाणी पाण्याची गळती सुरु आहे. या भ्रष्ट कारभाराकडे दुर्लक्ष करुन आ.लक्ष्मण पवार गढी पाणीपुरवठा योजनेच्या दर्जेदार कामाबाबत वारंवार तक्रारी देत आहेत. त्यांच्या तक्रारीवरून टाटा कन्सल्टन्सी सारख्या थर्ड पार्टीकडून चौकशी होवूनही त्यांचे समाधान होत नाही. लोक कल्याणाची कामे मंजुर करता येत नसली तरी चांगल्या कामाच्या तक्रारी करून अडथळे निर्माण करू नका. अगोदर ६५ कोटींच्या योजनेचा हिशोब गेवराईकरांना द्या आणि नंतर गढीच्या नळ पाणीपुरवठा योजनेची तक्रार करा असे आवाहन गढी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश कांबळे यांनी केले आहे. आ.लक्ष्मण पवारांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीला त्यांनी जाहिर पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

तालुक्यातील गढी ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा योजनेसाठी सन २०२२-२३ मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ९८ लाख रुपयांची अतिरिक्त पाणीपुरवठा योजना मंजुर झाल्यानंतर विद्यमान भाजपा आमदार लक्ष्मण पवार याविषयी वारंवार तक्रारी देत आहेत. वास्तविक महामार्गाच्या कामासाठी जुनी योजना आय.आर.बी. ने नादुरुस्त केल्यापासून नागरीकांना पाणी मिळत नव्हते, आय.आर.बी. च्या विरोधात आमदार महोदय कधीही बोललेले आम्हास दिसले नाहीत. मात्र नविन योजना मंजुर होताच तक्रारीचा सपाटा सुरु केला आहे. पूर्वीची जुनी योजना सन २०२५ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून मंजुर होती, आत्ताची योजना २०५३ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून मंजुर झाली आहे. यापूर्वीच्या योजनेतून माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली टंचाई परिस्थितीत अख्ख्या तालुक्याला गढी येथून पाणी देण्याचे काम झाले. मात्र चांगल्या कामाचे कौतुक करण्यास मोठेपणा लागतो असे सांगून उपसरपंच मंगेश कांबळे म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी नव्या योजनेसाठी पाठपुरावा करण्याचे सोडून गढी गावातील नागरिकांविषयी मनात दुजाभाव ठेऊन मंजुर योजनेच्या संदर्भाने तक्रारी दिल्या आहेत. त्यांच्या तक्रारीनंतर टाटा कन्सल्टन्सी सारख्या थर्ड पार्टी एजन्सीकडून कामाची गुणवत्ता तपासली गेली, या चौकशीमध्ये कोणताही गैरप्रकार आढळून आला नाही, तरीही आमदार महोदयाचे समाधान झाल्याचे दिसून येत नाही. गेवराई नगर परिषदेत पाणीपुरवठा योजनेवर एकाच कामाचे अनेकवेळा कोट्यावधी रुपयांची देयके उचलली गेली असल्यामुळे तसाच प्रकार गढी ग्रामपंचायतमध्ये झाला असावा याच भावनेतून कदाचित आमदारांनी तक्रार दिली असेल मात्र गेवराई नगर परिषदेएवढा भ्रष्ट कारभार आमचा नाही हेच यानिमित्ताने आमदारांना सांगायचे आहे. नगर परिषदेच्या बोगस कामामुळे शासनाचे ६५ कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेले आहेत. पैठण-गेवराई पाणीपुरवठा योजना अद्याप सुरु नसल्याचे उपसरपंच मंगेश कांबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानामधून दि.२५ ऑगस्ट २००९ रोजी १ कोटी ११ लाख, महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा योजनेतून दि.१२ नोव्हेंबर २०१४ रोजी ६३ लाख ७७ हजार महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियानातून पुन्हा दि.१० नोव्हेंबर २०१५ रोजी १ कोटी ३ लाख ८ हजार ५४४, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियानातून दि.१२ जानेवारी २०१७ रोजी ५६ कोटी ४२ लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ८५ लाख २३ हजार रुपये तर दि.११ सप्टेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियान अंतर्गत ५९ कोटी ३८ लाख रुपये अशी सुमारे ६५ कोटीहून अधिक रक्कम खर्च करूनही तुम्ही गेवराईकर नागरीकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देऊ शकला नाहीत. प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून टॅक्स भरणाऱ्या नागरीकांची फसवणुक तुम्ही करत आहात, शासनाने पाण्यासारखा पैसा दिला मात्र गेवराईकरांना तुम्ही पैशाइतके पाणी सुध्दा देऊ शकला नाहीत हे तुमचे मोठे अपयश आहे, त्यामुळे आमच्या सारख्या छोट्या गावातील लोकांना ज्ञान शिकविण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार उरला नसल्याची टीका शेवटी गढी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मंगेश कांबळे यांनी केली. यावेळी सरपंच अंकुश गायकवाड, रामदास मुंडे यांच्यासह इतर ग्रा.पं. सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here