माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात चार लाखांहून अधिक महिलांची तपासणी व उपचार – डॉ. सुरेश साबळे

0
39

बीड प्रतिनिधी :  राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवात महिलांसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविण्यात आले. अभियानाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळात असून अभियानात आतापर्यंत ४ लाख ११ हजार महिलांची आरोग्य तपासणी व उपचार केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली.

डॉ. सुरेश साबळे म्हणाले, राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवापासून (दि. २६ सप्टेंबर) माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान राबविले जात आहे. आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंडे देखील अभियान यशस्वी करण्यासाठी सुचना देत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील आरोग्य विभागाने सातत्याने सर्वच रुग्णालयांमध्ये हे अभियान सुरु केले आहे. अभियानात १८ वर्षांवरील सर्व महिलांची संपूर्ण तपासण्यांसह उपचारही मोफत करण्यात आले. यात रक्तदाब, मधुमेह, बीएमआय, हेमोग्लोबिन, रक्तगट, दंतरोग तपासणी, कान नाक घसा, गर्भाशयाचे कर्करोग, स्तनाचे कर्करोग, एक्स – रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, अतिजोखमीच्या मातांचे समुपदेशन, प्रसूती कुठे व कधी करावी या बद्दल मार्गदर्शन, गर्भधारणेपूर्वी घेण्याची काळजी, मासिक पाळी
मधील समस्या, सॅनिटारी पॅडचा वापर, तसेच मानसिक आरोग्य याबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या व मार्गदर्शन करण्यात आल्याचे आले. जिल्ह्यातील आरोग्य विभागाने यात धडाडीने सहभाग घेतला. जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, लोखंडी येथील मानसिक आजार व वृद्धत्व उपचार केंद्र, स्त्री रुग्णालयासह जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांत हे अभियान राबविले जात आहे. शुक्रवार (दि. सात ऑक्टोबर) पर्यंत तब्बल ४ लाख ११ महिलांच्या विविध तपासण्या करुन त्यांच्यावर आवश्यक उपचार केल्याचेही डॉ. सुरेश साबळे यांनी सांगीतले. अभियानातून महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबच त्यांच्यात आरोग्याबाबत जनजागृती होण्यासही मदत होत आहे. तसेच पौगांडावस्थेतील मुलींमध्ये शारिरीक व मानसिक बदलांबाबतही तज्ज्ञांच्या मार्फत मार्गदर्शन व समुपदेशन केले जात असल्याचे डॉ. साबळे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here