शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली-खा.शरद पवार

0
35

शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळा थाटात संपन्न

गेवराई प्रतिनिधी :  शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली, आयुष्याची 50 वर्ष लोकांसाठी दिली, त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे, त्यांना तुम्ही शक्ती द्या, त्यांच्या पाठिशी मी पुर्ण ताकदीने खंबीरपणे उभा आहे असे आवाहन खा. शरदचंद्र पवार यांनी केले. शिवाजीराव पंडित परिवाराने मला दिलेले प्रेम मी कधीही विसरु शकत नाही, दादा, आमच्यासाठी सदैव प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भिष्मपितामह अशी ओळख असलेले माजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्वपक्षीय नेते एकाच व्यासपिठावर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सिक्कमचे माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील, विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, आ. राजेश टोपे, आ. प्रकाश सोळंके, आ. सुरेश धस, आ. राहुल पाटील, आ. सतिष चव्हाण, आ. संदिप क्षिरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. विक्रम काळे, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंदराव बोडके यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी शिवाजीराव पंडित यांचा मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.

मराठवाड्यातील ज्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मला मोलाची साथ दिली त्यात शिवाजीराव पंडित अग्रभागी होते, पंचायत समिती पासुन त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि त्यानंतर आमदार म्हणुन त्यांनी सर्वसामान्य जनतेची सेवा केली. जायकवाडी कालव्याच्या माध्यमातुन तालुक्यात ऊस शेती विकसित केली आणि त्यासाठी जयभवानी कारखाना उभा करुन शेतकर्‍यांना सन्मानाने जगण्याचे बळ दिले. शिवाजीराव पंडित यांनी शैक्षणिक संस्था उभा करत सहकाराच्या माध्यमातुन अनेक विकासाची कामे केली. अलीकडच्या काळात पद गेले की लोक नाउमेद होतात मात्र शिवाजीरावांनी राजकीय निवृत्तीनंतर कृषी क्षेत्रात काम चालु ठेवल्याने मला समाधान वाटते. त्यांची पुढची पिढी सक्रीय राजकारणात आहे, जनतेच्या प्रश्नांची त्यांना जान आहे. शिवाजीरावांनी आयुष्याची 50 वर्ष जनतेसाठी खर्च केले, आता जनतेने त्यांच्या पुढच्या पिढीला शक्ती देण्याचे काम केले पाहिजे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांनी केले.

यावेळी बोलतांना केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, पंडित परिवाराचे आणि माझे स्नेहाचे संबंध आहेत. गेवराई विधानसभा मतदार संघाने मला भरभरुन आशिर्वाद दिले, शिवाजीराव पंडित परिवाराचे प्रेम मी कधीही विसरु शकत नाही. दादांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला सर्व राजकीय पक्षाचे नेते एकाच व्यासपिठावर आले यातच दादांचे मोठे पण दिसुन येते. दादांची कारर्कीद खुप मोठी आहे, ज्या काळात खेड्यापाड्यामध्ये वाहतुक आणि दळणवळणाची साधणे उपलब्ध नव्हती त्या काळात लोकांना पकडुन ठेवण्याचे कसब दादांकडे होते. शेतीवर प्रेम करणारा आपला नेता बोलण्यासाठी उभा राहिला की, लोक उत्साहाने टाळ्या वाजवतात ते चित्र मला आज या ठिकाणी पहायला मिळाले. येणार्‍या काळामध्ये दादांच्या
100 वा अभिष्टचिंतन सोहळ्याला दादांचा आशिर्वाद घेण्यासाठी मी येणार आहे, तुम्ही मात्र दादांना आशिर्वाद देण्यासाठी त्यांच्या पिढीला येणार्‍या काळात बळ देण्याचे आवाहन रावसाहेब दानवे पाटील यांनी केले.

यावेळी बोलतांना खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, शरद, श्रीनिवास आणि शिवाजी हे तीन एस इथे हजर आहेत एकदा त्यांना अमर करा, तुमच्या जे मनात आहे ते अमच्या झोळीत येवु द्या अशी इच्छा व्यक्त करतांना ते म्हणाले की, या निमित्ताने दादांचा तोच जुना रुबाब पाहण्यासाठी मी इथ आलो आहे. त्या काळातील दादांचा रुबाब आजही तसाच आहे, वाढदिवसानिमत्त येतांना दादांना कधी एकदा भेटेल अशी भावना निर्माण झाली होती, शिवाजीराव दादांनी गेवराई तालुक्यासाठी भरीव काम केलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पुत्र पुढे काम करत आहेत. आपली मुल मोठी व्हावीत, त्यांनी नाव कमवावे अशी कोणत्याही पित्याची इच्छा असते या निमित्ताने माझे एकच मागणे आहे येणार्‍या काळामध्ये विजयसिंह पंडितांचा विजय पाहतांना शिवाजीरावांचा पटका पडावा एवढे प्रेम त्यांना द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, गेवराई आणि परिसराच्या विकासात शिवाजीवाव पंडितांना आपला उमेदीचा काळ खर्च केला. जायकवाडीचे पाणी या भागाला मिळावे म्हणुन दादांनी खुप मोठे काम केले त्यामध्ये मलाही काम करता आले असे सांगुन दुष्काळी भागासाठी जायकवाडी कालवा किती महत्वाचा आहे ते दादांनी त्यावेळेस ताडले होते. दादा स्वाभिमानी आहेत ते कोणापुढे झुकले नाहीत यापुढे मात्र त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदीमय होण्यासाठी येणार्‍या काळात विजयसिंह पंडितांना विजयी करा. पराभवानंतरही दुसर्‍याच दिवशी पासुन विजयसिंह पंडितांनी खुप मोठे काम केले असुन शिवाजीरावांचा वारसा पुढे नेण्यासाठी ते विकासाचा पुढचा अध्याय लिहीतील आणि गेवराई तालुका पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात बोलतांना आ. धनंजय मुंडे म्हणाले की, शिवाजीराव दादांना राजकारणातील पितामह का म्हटले जाते तर दादांनी ठरवले तर ते पुर्ण झालेच म्हणुन समजा. एखाद्या निर्णयासाठी त्यांनी काढुन ठेवलेली टोपी आणि त्याचे परिणाम सर्वांना माहित आहे, असे म्हणाताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करुन त्यांना दाद दिली. दादांनी आजवर जिल्ह्यातील जनतेसाठी खुप कामे केली, त्यांना 85 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण एकत्रित आलात आज विजयसिंह पंडित यांना 2024 ला आमदार करण्याचा संकल्प करा हिच खरी सदिच्छा दादांसाठी राहिल असे सांगतांना धनंजय मुंडे म्हणाले वडीलांचा 85 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठे भाग्य लागते ते पंडित बंधुना मिळाले त्यामुळे ते नशिबान असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात बोलतांना आ. राजेश टोपे म्हणाले की, शिवाजीराव दादांनी आपले संपुर्ण जीवन लोककल्याणासाठी व्यथीत केले, हा अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या कामाची पावती आहे. दादा एक सच्चा माणुस आहे आणि या सच्चा मित्रासाठी खा. पवार साहेब आज उपस्थित राहिले याचा मला आनंद आहे. शिवाजीराव पंडित परिवार आणि टोपे परिवार यांच्यामध्ये स्नेहाचा संबंध आहे. दादांनी ग्रामीण भागातील हजारो लोकांना जिंकले आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक संस्था उभा राहिल्या आणि त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला झाला असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात बोलतांना मंत्री संदिपानराव भुमरे म्हणाले की, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात श्रेष्ठ आणि जेष्ठ व्यक्तीमत्व म्हणुन शिवाजीराव पंडित यांच्याकडे पाहिले जाते. राजकीय, सामाजिक आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव काम केले आहे. आज ते राजकारणातुन निवृत्त झाले असले तरी कृषी आणि समाजकारण यात त्यांचे काम आजही सुरु आहे, त्यांनी एकेकाळी भुषविलेल्या रोहयो खात्याचा मी आज मंत्री आहे याचा मला अभिमान आहे असे ते यावेळी म्हणाले.

या प्रसंगी बोलतांना ना. अंबादास दानवे म्हणाले की, शिवाजीराव पंडित हे मराठवाड्याला प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व आहे. आरक्षणाचा प्रश्न असो की जायकवाडीचे पाणी दादांनी सामान्य माणुस डोळ्यासमोर काम केल्यामुळे लाखो लोकांचे आशिर्वाद त्यांच्या पाठिशी आहेत.

सत्काराला उत्तर देतांना शिवाजीराव दादा पंडित म्हणाले की, मी राजकारणातुन निवृत्त झाल्यानंतर सत्कार घेण्याचे बंद केले होते पण माझे नेते शरद पवार साहेब येणार आहेत हे ठरल्यामुळे मला हा सत्कार घ्यावा लागला. 1962 पासुन मी गेवराई तालुक्यासाठी सालगड्यासारखे काम केले आहे. आज मी थकलो असलो तरी तुमची राखन करतो आहे. यासाठी माझी तिन्ही मुले इमानदारीने काम करत आहेत, हा अभिष्टचिंतन सोहळा पाहुन माझे जीवन सार्थक झाल्याचा आनंद होतो आहे. लोकांच्या आशिर्वादामुळेच मी हे करु शकलो. शाळा निर्माण केल्या, नवोदय विद्यालय आणले यातुन शेकडो मुले देशाच्या विविध भागात काम करत आहेत. ही सारी मुलं ग्रामीण भागातील शेतकर्‍यांची आहेत याचा मला अभिमान आहे. राजकारणाचा गुरुमंत्र मला बाबुराव पाटील अनगरकर यांनी दिला त्यांचे आशिर्वाद मी कधीच विसरु शकत नाही. ते माझे ट्रेनिंग सेंटर होते आज आपल्या व्यासपिठावर केंद्रिय रेल्वे मंत्री आहेत या निमित्ताने जळगांव ते सोलापूर या रेल्वे मार्गाची मागणी आज त्यांना करतो आहे. या अखेरच्या काळामध्ये माझी एकच इच्छा आहे माझ्या विजयसिंहला पदरात घ्या आणि निवडणु आणा असे आवाहन करुन उपस्थितांना त्यांनी भारावुन टाकले.

आपल्या प्रास्ताविकपर भाषणात अमरसिंह पंडित म्हणाले की, दादांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पवार साहेबांची भक्कम साथ मिळाली, दादा राजकारणात पवार साहेबांशी एकनिष्ठ राहिले, दादांचा वारसा आम्ही पुढची पिढी सक्षमपणे चालवत आहोत. ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्या वेळी पवार साहेबांनी भक्कमपणे पाठिशी उभे राहुन मदत केली. पवार साहेबांमुळेच जयभवानी पुन्हा एकदा उभा राहिला आहे असे सांगुन दादांच्या जनसेवेचा वारसा पुढे चालु ठेवणार असल्याचे अमरसिंह पंडित यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात सांगितले.
कार्यक्रमाला गेवराई तालुक्यातील संतमहंत मोठ्या संख्येने उपस्थित होते, त्यांचा सत्कार समितीच्या वतीने गौरव करण्यात आला. संतमहंतांच्या वतीने अखील भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी शुभाशिर्वादपर भाषण करुन साधुसंतांच्या वतीने दादांना आशिर्वाद दिले.

यावेळी नारायणगडचे मठाधिपती महंत शिवाजी महाराज, गहिणीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज, चाकरवाडी संस्थानचे महंत महादेव महाराज, बंकटस्वामी संस्थानचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे यांच्यासह माजीमंत्री पंडितराव दौंड, माजी आमदार राजन पाटील, विलासराव खरात, भिमराव धोंडे, साहेबराव दरेकर, राजेंद्र जगताप, सिराज देशमुख, जनार्धन तुपे, किशोर पाटील, राधाकृष्ण होके पाटील, सय्यद सलीम, संजय वाघचौरे, पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, डॉ. नरेंद्र काळे, जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, नगराध्यक्ष रजकिशोर मोदी, माजी कुलगुरु वेदप्रकाश पाटील, जयसिंग सोळंके यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते. गेवराई विधानसभा मतदार संघातील शिवाजीराव दादा पंडित प्रेमी कार्यकर्त्यांनी एकत्रित येवुन अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. पंडित कुटूंबीय, शिवाजीराव दादा पंडित यांच्या पत्नी शारदादेवी पंडित, पंडित परिवाराचे नातेवाईक व गेवराई विधानसभा मतदार संघातील हजारो नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव चाटे यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here