दहीहंडीला खेळाचा दर्जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रारंभ वृत्तसेवा
राज्यात दहीहंडी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. याच सणानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाचा निर्णय घेत दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. यात प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला ७ लाख ५० हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य देण्यात येईल. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला ५ लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाईल.
दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ अधिवेशनादरम्यान चर्चा झाली होती. या निर्णयामुळे सरकारचे गोविंदा प्रेमीकडून आभार व्यक्त केले जात आहेत!