मानवी जीवन चांगल्या संस्कारावरच अवलंबुन आहे-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

0
36
बीड  प्रतिनिधी :वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय मानवाला सुखी, समाधानी आणि निरोगी मनाने जीवन जगण्याची शिकवण देतो त्यामुळे मानवी जीवन चांगल्या संस्कारावर अवलंबुन आहे असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
बीड तालुक्यातील ढेकणमोहा गोरक्षनाथ टेकडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता प्रसंगी ह.भ.प.रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर (बुलढाणा) यांचे काल्याचे किर्तन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ.योगेश क्षीरसागर, ह.भ.प.हरिदास जोगदंड, अरूण डाके, दिनकर कदम, गंगाधर घुमरे, सखाराम मस्के, अरूण बोंगाने, बप्पासाहेब घुगे, गणपत डोईफोडे, ह.भ.प.सुरेश महाराज जाधव, बालाप्रसाद जाजु, अरूण लांडे, हनुमान देवकते आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, गोरक्षनाथ टेकडी विकासासाठी जेंव्हा जेंव्हा निधीची गरज पडली तेंव्हा माझ्याकडे पर्यटन खाते असतांना 3 ते 4 कोटींचा विकास निधी उपलब्ध करून दिला. स्व.किसन बाबा हे विसाव्या शतकातील महान संत होते. अनेक विचारवंत महाराजांची किर्तने आणि प्रवचने या ठिकाणी आयोजीत होतात. विचारांचा महासागर याठिकाणी सतत वाहतो. जिथे हरिचा दास जन्म घेतो तिथेच मानवाला हरिदर्शन निश्‍चित मिळते. आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवुन या टेकडीसाठी विकास निधी उपलब्ध करून दिला असेही ते म्हणाले. सद्गुरू संत किसन बाबा महाराज श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी यांच्या 24 व्या पुण्यस्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह आयोजीत केला होता. श्रीक्षेत्र गोरक्षनाथ टेकडी गर्भागिरी असे या पर्वताचे नांव असुन ही टेकडी संत महंतांची जुनी परंपरा सिध्द करणारी आहे. संत सिध्दु बाबा, महादु बाबा, साधु बाबा, किसन बाबा व महंत नवनाथ बाबा आदि महंतांनी याठिकाणी आपले योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here