परमार्थात विश्वासाला महत्व आहे- ह.भ.प. शिवाजी महाराज

0
35

वै. महादेव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र नारायणगडावर कीर्तनासह महाप्रसाद

बीड :  परमार्थ करत असताना त्यामध्ये विश्वासाला खूप मोठे महत्व आहे. गुरु-शिष्याची परंपरा असो की, कुठल्याही क्षेत्रातील जोडी असो. त्यांच्यातील विश्वास हा खुप महत्वाचा आहे. आणि या विश्वासामुळेच आज परमार्थ टिकून असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांनी केली.
श्री क्षेत्र नारायण गडाचे आठवे महंत वैकुंठवासी महादेव महाराज यांची रविवारी (दि.17) 12 वी पुण्यतिथी होती. त्यानिमित्त श्री क्षेत्र नारायण गड येथे मठाधिपती हभप शिवाजी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री बंकटस्वामी संस्थानचे मठाधिपती हभप लक्ष्मण महाराज मेंगडे, श्री क्षेत्र रामगड संस्थानचे मठाधिपती स्वामी योगीराज महाराज, हभप नारायण महाराज डिसले, गडाचे विश्वस्त बळीराम गवते, गोवर्धन काशिद आदींची उपस्थिती होती. यावेळी कीर्तनात शिवाजी महाराज यांनी ‘संताचिये पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झाला तयाचा… तेची माझे हित्करितीय सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी…’ या अभंगावर चिंतन केले. यावेळी महंत शिवाजी महाराज म्हणाले की, वै.महादेव महाराज यांनी खुप मोठा संघर्ष केलेला आहे. त्यांनी समाज संघटित करुन त्यांना हिताचा मार्ग दाखवला. गावागावात अखंड हरिनाम सप्ताह उभारुन गाव एकत्र केले. गावातील पुशहत्या बंद केल्याचे सांगितले. तसेच कुठल्याही क्षेत्रात विश्वास महत्वाचा असतो. अगदी परमार्थ करतानाही विश्वास खुप महत्वाचा आहे. सेवा केल्यानंतर देवांचा, संतांचा आशीर्वाद मिळतोच, तो मागायची गरज नसते. असेही महंत शिवाजी महाराज यांनी सांगितले. यावेळी मृदंगाचार्य ब्रम्हदेव महाराज नवले, गायनाचार्य शिवाजी महाराज मिसाळ, राजाभाऊ महाराज गवते, गोकुळ महाराज उबाळे, लक्ष्मण महाराज तकिक, रामनाथ महाराज सालपे, अक्षय महाराज तळेकर यांच्यासह गडाचे सर्व टाळकरी मंडळींची उपस्थिती होती. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here