मोर्चा तर निघणारच! घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका – आ.विनायक मेटे

0
44

बीड – कोरोनाचे सर्व नियम पाळून मराठा समाज मोर्चा काढत आहे. त्यामुळे घाबरू नका, अफवांवर विश्वास ठेऊ नका. काहीजण समाजात दुफळी तयार करण्याचं काम करीत आहेत. त्यांना कुणीही बळी पडू नका. हा मोर्चा मराठा आरक्षणासाठी आहे. परंतु काहीजण हा मोर्चा आ.विनाक मेटे यांच्या आमदारकीसाठी असल्याच्या अफवा जाणीवपुर्वक पसरवत आहेत. परंतु मी मागेही सांगितलं आहे आणि आजही तेच सांगतोय मेटेला आमदारकी मिळविण्यासाठी मराठा आरक्षणाचा प्रश्न वेठीस धरण्याची मला अजिबात गरज नाही. मेटेनी मराठा समाजासाठी आतापर्यंत जेवढं काम केलं आहे त्याचे आशीर्वाद म्हणून मला आता कायमस्वरूपी आमदारकी मिळणारच आहे. हा लढा मराठा समाजातील गोरगरीबांच्या शिक्षणातील सवलतींचा, नोकरीसाठीच्या आरक्षणाचा आहे. त्यामुळे समाजाने लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे, असे अवाहन आ.विनायक मेटे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

आ.मेटे म्हणाले, मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षणाचा पहिला लढा ज्यांनी उभारला ते स्व.आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील हे देखील नियोजनाच्या बैठका घेत आहेत. ज्यांचं बीड जिल्ह्यासाठी किंवा मराठा आरक्षणासाठी काडीचंही योगदान नाही त्यांनी या मोर्चाला विरोध करण्याचं काम सुरु ठेवलं आहे. त्यांची ही सुडबुध्दी, आकस, परंपरा पुर्वीपासुनची आहे. खासकरून काँग्रेस पक्ष इथे कोणालाही पाठवत असून त्यांनी केविलवाणा विरोध सुरु केलेला आहे. ज्यांनी मराठा समाजाला आतापर्यंत आरक्षण नाकारण्याचं काम केलं त्यांनी पहिली हत्या अण्णासाहेब पाटील यांची घडवून आणली. त्यानंतरही अनेकांनी या लढ्यासाठी आपलं बलीदान दिलं आहे. या सगळ्यांच्या काँग्रेसने हत्याच घडवून आणल्या. काँग्रेसने आतातरी मराठा आरक्षणाचा विरोध सोडावा. चिलटा चपाट्यांना पुढं करून अशोक चव्हाण या मोर्चाला विरोध करीत आहेत. माझं खुलं अवाहन आहे की त्यांनी समोरा समोर येऊन खुला विरोध करावा. मराठा आरक्षणात काय चुकलं याची समोरासमोर येऊन अशोक चव्हाण यांनी चर्चा करावी, मी त्यांच्या सगळ्या चुका त्यांच्या सांगतो. मात्र आपलं मराठा आरक्षण न मिळाल्याचं आपलं पाप झाकण्यासाठी ते अशा कुणालाही पुढं करून बीडमध्ये पत्रकार परिषदा घेत आहेत. मात्र समाजाने असल्या लोकांना किती महत्व द्यायचं हे ठरवून घ्यावं. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की आपआपल्या समाजाचं तरी भलं व्हावं यासाठी तरी प्रयत्न करा, असेही आ.मेटे म्हणाले.

आडवा आडवी केली तर आमच्याशी गाठ
मोर्चेकर्‍यांची प्रशासनाने आडवा आडवी करू नये. आम्ही प्रशासनासोबत सहकार्याची भुमिका घेत आहोत. कोरोनामुळे मोर्चेकर्‍यांना मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंन्सबाबत आम्ही खबरदारी घेणार आहोत. त्यामुळे कोणीही मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करू नये, कुणी जाणीपुर्वक मराठा आरक्षणाच्या लढ्यात आम्हाला आडवं येत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की गाठ आमच्याशी आहे, असा इशाराही आ.विनायक मेटे यांनी केले.

आरक्षण न मिळण्यास सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत
आरक्षण न मिळण्यास राज्य सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. जेव्हा जेव्हा न्यायालयात आरक्षणाच्या बाजुने भुमिका मांडायची वेळ आली त्या त्यावेळी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजु मांडली नाही. आम्ही सगळ्यांना आजही विनंती करीत आहोत, तुम्ही कुणाच्याही सोबत येऊ नका. तुम्ही केवळ मराठा आरक्षणाच्या बाजुने या. मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पुन्हा एकदा हा लढा सुरु आहे. मराठा समाजाच्या इतरही अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या पुर्ण झाल्या तर समाजाला खूप मोठा फायदा होणार आहे. आज आ.विनायक मेटे बीडमध्ये पुढाकार घेत आहेत. असाच राज्यभरात त्या त्या ठिकाणचे लोक पुढाकार घेऊन मोर्चे काढतील. त्यामुळे एकटे विनायक मेटे हिरो होतील ही मानसिकता बाजुला ठेवून मोर्चात सहभागी व्हावे, असेही नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले.

प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी जोडला
मराठा क्रांती मोर्चाचा प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या राजकीय पक्षाशी जोडला गेला आहे. त्यामुळे कुणीही विनायक मेटे यांना नाव ठेऊ नये. आरक्षण मोर्चाचा प्रश्न कुठल्याही राजकीय पक्षाशी जोडला जाऊ नये. जे कोणी आरक्षण प्रश्नावर विधायक मार्गाने आंदोलनाची भुमिका घेतील त्या त्या लोकांच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here