नाशिक : राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले.
मधुकर पिचड यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरुवात करत प्रदीर्घ काळ राज्य विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले होते. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी सांभाळल्या होत्या.
मुख्यमंत्र्यांची शोकसंवेदना
मधुकर पिचड यांच्या निधाननंतरच्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते.” त्यांच्या निधनाने आदिवासी समाजासाठी अहोरात्र झटणारा आणि कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “मधुकर पिचड यांनी आदिवासी भागात मोठे काम केले आहे. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ काम पाहिले. याकाळात त्यांनी आदिवासी बांधवांच्या कल्याणासाठी अनेकविध निर्णय घेतले होते. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी जवळपास 35 वर्ष प्रतिनीधीत्व केले,” असं त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
शरद पवारांचे होते खंदे समर्थक
भाजप पक्षात येण्याआधी मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. ते शरद पवार यांचे खंदे समर्थक मानले जायचे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणूनही मधुकर पिचड यांनी नेतृत्व केलं होतं.
2019 साली त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.अहिल्यानगर (अहमदनगर) अकोले विधानसभा मतदारसंघातून मधुकर पिचड हे तब्बल सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘एक्स’ वर त्यांनी लिहिलं आहे की, “माझे जुने सहकारी मधुकरराव पिचड यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन मधुकर पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.”