महाराष्ट्रात ‘देवेंद्र पर्व’ सुरू; शानदार सोहळ्यात घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

0
16

मुंबई : येथील आझाद मैदानात आयोजित शानदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र सरीता गंगाधर फडणवीस यांनी शपथ घेतली. यामुळे आता राज्यात ‘देवेंद्र पर्व’ सुरू झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

याचवेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही शपथ दिली. अखेर 13 दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत आझाद मैदानावर अतिशय भव्यदिव्य स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा कार्यक्रम आज पार पडला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालं. महायुतीला 288 पैकी तब्बल 230 जागांवर यश मिळालं. महायुतीला मिळालेलं हे यश अभूतपूर्व असं यश आहे. आतापर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्रात कोणत्याच युतीला आणि आघाडीला इतकं यश मिळालेलं नव्हतं. या यशात भाजपचा मोठा वाटा आहे. भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री बनेल हे जवळपास निश्चित होतं. पण तरीदेखील महायुतीत अंतर्गत सुरु असलेल्या घडामोडी, तसेच राज्याचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्यासाठी भाजपने घेतलेला वेळ यामुळे शपथविधीचा कार्यक्रम रखडला होता. अखेर विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तब्बल 13 दिवसांनी देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

या शपथविधी सोहळ्याला तब्बल 19 राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा ‘देवेंद्र’पर्वाला सुरुवात झाली आहे.

शपथविधीनंतर राज्यभरात जल्लोष

शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात आला. शहरात, गावांत, वॉर्डात, मोहल्ल्यात फटाके फोडण्यात आले. आतीषबाजी करण्यात आली. ठिकठिकाणी मिठाई वाटून आनंद साजरा करण्यात आला. शपथविधीचे थेट प्रक्षेपण राज्यातील प्रत्येकाने बघावे, यासाठी राज्यातील प्रत्येक शहरात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. एकंदरच आज शपथविधी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यभरात उत्सवाचे वातावरण होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here