बदलापूरचा बदला; शिंदेचं एन्काऊंटर की ठरवून केलेला खून?

0
33

काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे मन सुन्न करणारी घटना घडली. समाजमन या घटनेनं अस्वस्थ झालं. लोकांचा संताप रस्त्यावर दिसला. घटना नोंदवून घेण्यातही पोलिसांनी जो अक्षम्य हलगर्जीपणा केला त्याचे पडसाद राज्यभर उमटले. सरकारने आश्वासन देऊन कसातरी जन उद्रेकाला ब्रेक लावला. ही घटना सत्ताधाऱ्यांसाठी निवडणुकीत त्रासदायक ठरू शकते, असे वाटत असताना या प्रकरणातील मुख्य आरोपीचा काल एन्काऊंटर झाला. या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उभे केले. आणि या प्रश्नात पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले.

काल झालेली घटनाच मुळात अनेक शंकांना बळ देणारी आहे. दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. दुसरीकडे शिंदेच्या दोन पत्नीनीही त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा हा आरोप होता. दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा ट्रान्झिट रीमांड च्या आधारे पोलिसांनी ताबा घेतला होता. पोलिस त्याला ठाण्याकडे नेत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्व्हर हिसकून गोळीबार केला. यात मोरे गंभीर जखमी झाले. शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हर मधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला असे पोलिसांचे म्हणणे आहे. रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले.

ही पोलिसांनी सांगितलेली कहाणी आहे. मात्र या फिल्मी स्टाईल कहाणी ने अनेक प्रश्न उपस्थित केले. विरोधकांच्या आरोपात हे सर्व प्रश्न आले आहेत. याचे उत्तर आंदोलन करणाऱ्या तमाम नागरिकांना जाणून घ्यायची आहेत.

एखादा आरोपी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असताना त्याच्या हाताला बेड्या असतात. संवेदनशील प्रकरणातील आरोपी असल्याने त्याला एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणीं नेताना विशेष काळजी घेणे गरजेचे होते. जर त्याच्या हातात बेड्या असतील तर तो बंदूक कशी काय हिसकावू शकतो, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. जर गाडीत बंदूक हिसकली तर बंदूक हिस्कावल्यानंतरही त्याला गोळी झाडतपर्यंत पोलिसांनी वेळ दिलाच कसा? आणि या प्रश्नातून विरोधकांनी केलेल्या आरोपांना बळ मिळते. त्याच्या हिंसक हालचाली पोलिसांच्या नजरेतून कशा सुटल्या? कुणाच्या तरी इशाऱ्यावर पोलिसांनी हे मुद्दाम घडवून आणलेले एन्काऊंटर तर नव्हे ना, असा प्रश्न काल प्रत्येक मराठी मनात उपस्थित झाला.

वर्धेतील मुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार देशोन्नतीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश कथले यांनी या संपूर्ण प्रकरणावर केलेलं भाष्य अंतर्मुख करणारे आहे.
न्यायव्यवस्थेचे संकेत पोलिसांनी पायदळी तुडवावे,त्याचे रखवालदार राज्यकर्ते व्हावे,चौकशा होतीलही,याकरिता समितीही नियुक्त होईल पण यातून अंतिम लोकहीत साध्य होणार नाही, मनाच्या कप्प्यात घर करून बसलेली असुरक्षितता केस मोकळे करून थैमान घालत नाचते,येथे लोकशाही वरील विश्वासाचा श्वासच गुदमरतो. सध्या सगळे सत्ता परिवर्तनाकरीता लढतात, पण ही क्रांती नव्हे, याकरिता जनमानस तयार करावे लागेल, या बदलाचे आश्वासन म्हणजे सत्ता मदानध डरकाळी वाटू नये,अशा नाजूक पायरीवर समाज व्यवस्था आणून ठेवली गेली आहे, समाजात पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे. महिला, मुली,शेतकरी शेतमजुर,असे विविध समाज घटक असुरक्षिततेत वावरत आहेत. यात राज्यकर्ते धन्यता कवटाळून न्यायालयाबाहेरचा न्याय बळकट करू लागले तर त्याचा देशाला धोका आहें, हे वास्तव आहे. विखुरलेले समाज घटक सत्ता संपादनाला हातभार लावतीलही; पण देशाचे काय, याचे उत्तर कोण देणार? वैश्विक सत्ताकारण यशस्वी झाल्याचे ढोल बडविणे सोपे आहे पण समाजघटकाची मने जोडणे महत्त्वाचे आहे. दोन निरपराध मुलीवर पाशवी अत्याचार नंतर अत्याचार करणाऱ्याचा खून तसेच बदलापूरच्या बदला ‘पूर्ण’ तेने जन संवेदनशीलतेलाच रक्तबंबाळ केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here