नागपूर (Nagpur), दि.18 : सामान्य जनतेला दंतविषयक अत्याधुनिक सर्व उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी दंत महाविद्यालय सुपर स्पेशालिटी इमारतीच्या बांधकामाला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केले.
या महाविद्यालयाला नॅकमार्फत ‘ए प्लस’ दर्जा प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन सोहळा शासकीय दंत महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी श्री. मुश्रीफ बोलत होते.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक (दंत) डॉ. विवेक पाखमोडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये तसेच शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर उपस्थित होते.
नागपूर येथील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयास राष्ट्रीय मूल्यांकन परिषदेतर्फे ए प्लस मूल्यांकन प्राप्त झाले आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचा दर्जा प्राप्त करणारे पहिले शासकीय दंत महाविद्यालय असल्याचे सांगताना श्री. मुश्रीफ म्हणाले की, वैद्यकीय दंत महाविद्यालयातील रिक्त जागा लवकरच भरण्यात येतील. याशिवाय शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील आवश्यक वाढीव पदव्युत्तर जागेसंदर्भातही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.
श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते डॉ. विनय हजारे, डॉ. राम ठोंबरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नॅक संचालन समितीचे सदस्य डॉ. ज्योती मनचंदा, डॉ. शुभा हेगडे, डॉ. वर्षा मानेकर, डॉ. नुपूर निनावे, डॉ. दयमंती आत्राम, डॉ.दीपक घाडगे, डॉ. चेतन फुकाटे, डॉ. रानू इंगोले, डॉ. शिल्पा वऱ्हेकर यांना प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. विभाग प्रमुख डॉ. मंगेश फडनाईक, डॉ. मंजुषा वऱ्हाडपांडे, डॉ. रितेश कळसकर, डॉ. अरुण खळीकर, डॉ. प्रशांत पंदिलवार, डॉ. अशिता कळसकर, डॉ. सचिन खत्री, डॉ. अमित पराते, डॉ. सुलभा रडके, नंदिनी न्यालेवार, अनिल निमसरकर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैभव कारेमोरे यांनी तर डॉ. ज्योती मनचंदा यांनी आभार मानले