जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सज्ज

0
31

2330 मतदान केंद्रावर ग्रामपंचायत मतदान प्रक्रिया पार पडणार
185 मतदान केंद्र संवेदनशिल, 24 अतिसंवेदनशिल
संवेदनशिल, अतिसंवेदनशिल केंद्रावर राहणार विशेष बंदोबस्त -पोलीस अधीक्षक
बीड तालुक्यात सर्वात जास्त अतिसंवेदनशिल केंद्र

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : राज्यातील पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतचा मोठा आकडा असून राज्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणूका बीड जिल्ह्यात होत असून 704 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत असून या अनुषंगाने या निवडणूका जिल्ह्यात शांततेत पार पडाव्यात यासाठी पोलीस अधीक्षक विशेष नियोजन केले आहे. येणाऱ्या निवडणूकीच्या अनुषंगाने आज सर्व ठाणेदारांच्या बैठक बोलावली असून या बैठकीत सर्व ठाणेदारांना योग्य त्या सूचना करणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली. जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूका 2330 मतदान केंद्रावर होत असून यातील 185 मतदान केंद्र संवेदनशिल आहेत. तसेच 24 मतदान केंद्र अतिसंवेदनशिल आहेत. या दोन्ही ठिकाणी पोलीसांची विशेष नजर राहणार असून तगडा पोलीस बंदोबस्तही असणार आहे. निवडूकांच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून ग्रामपंचायत निवडणूका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वात जास्त आकडा बीड जिल्ह्यात असून 704 ग्रामपंचायतीच्या निवडणूका जिल्ह्यात पार पडत असून या सर्व निवडणूका शांततेत पार पडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा वेळोवेळी संबंधित विभागाकडून आढावा घेताना दिसत आहेत. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्हा पोलीस प्रशासनास विशेष सूचना करून निवडणूकीच्या काळात सर्वत्र शांतता राहावी यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. 943 शस्त्रांपैकी 585 शस्त्र आतापर्यंत जमा करण्यात आले आहेत. तसेच गेल्या पाच वर्षामध्ये निवडणूकीदरम्यान एकूण 36 गुन्हे दाखल असून यात 200 आरोपी आहेत. 107 प्रमाणे 553 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहते. 144 प्रमाणे 163 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यासह इतर कारवाया जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सर्व ठाणेदाराची बैठक आज 5 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात होणार असून या बैठकीमध्ये सर्व ठाणेदारांना पोलीस अधीक्षक योग्य त्या सूचना करणार आहेत. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये पोलीस प्रशासन कोम्बींग ऑपरेशन राबवत असून यात मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनाची विशेष नजर असणार आहे. बाहेरून सुद्धा विशेष पोलीस बंदोबस्त बोलावला असून 18 डिसेंबरला होणारी मतदान प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे दिसते.
जिल्ह्यात 185 मतदान केंद्र संवेदनशील तर 24 अतिसंवेदनशिल
बीड जिल्ह्यामध्ये 2330 मतदान केंद्रापैकी 185 मतदान केंद्र संवेदनशिल असून 24 अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. यात सर्वात जास्त संवेदनशील मतदान केंद्र बीड तालुक्यात असून तो आकडा 34 आहे. आष्टी-28, पाटोदा-34, अंबाजोगाई-30, परळी-11, केज-12, धारूर-7, माजलगाव-8, वडवणी-9, गेवराई-6 असा क्रम लागतो. या संवेदनशिल व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 704 ग्रा.पं.चे चित्र आज सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार
704 ग्रामपंचायत निवडणूकीची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू असून आज फॉर्म काढण्याची शेवटचा दिवस असून संबंधित तहसील कार्यालयात ही प्रक्रिया सुरू आहे. सर्वच तहसील कार्यालयामध्ये फॉर्म काढण्यासाठी सुद्धा गर्दी दिसून आली. दुपारपर्यंत आकडेवारी मिळू शकली नव्हती परंतु सायंकाळपर्यंत सर्व आकडेवारी मिळाल्यानंतर जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here