राज्यात 23 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

0
36

औरंगाबाद, बीड मध्ये सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या

शिंदे-फडणवीस सरकारचे 23 दिवस पुर्ण; शेतकऱ्यांसाठी एकही निर्णय दिलादायक नाही

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात प्रभावी योजना राबविण्याची गरज

प्रारंभ वृत्तसेवा

बीड : राज्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबता थांबत नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै रोजी शपथ घेतली, त्यांनी राज्याचा कारभार हातात घेऊन 23 दिवस झाले. त्यांच्या 23 दिवसात त्यांनी अनेक बैठका घेऊन अनेक निर्णय घेतलेले आहेत. परंतु त्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष असे कोणतेच निर्णय आज पर्यंत घेतलेले नाही. गेल्या 23 दिवसात राज्यात 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात सर्वात जास्त आत्महत्या मराठवाड्यात झालेल्या आहेत. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आमहत्या केल्याची नोंद आहे. यासह बीड जिल्ह्यात सुद्धा जास्त आत्महत्या झाल्या आहेत. महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पहिला संकल्प शिंदे सरकारने केला होता. येणाऱ्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेषता मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज आहे.

 

मराठवाड्यातील शेतकरी वर्ग गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांमध्ये अडकलेला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकरी तर आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून कर्जबाजारी झाला आहे. बीड-उस्मानाबाद-जालना या जिल्ह्यांना मुबलक पाणीपुरवठा नसल्याने येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यामुळे या जिल्ह्यात ज्यावेळेस पाऊस पडेल त्याचवेळी येथील शेतकरी आनंदी असतो. त्यातही रोगराईमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. तसेच सावकाराकडून घेतलेले कर्ज उत्पन्न आल्यानंतर फेडायचे असते परंतु उत्पन्नच जर हाती आले नाही तर त्या सावकाराचाही कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत जातो. या सर्व समस्यातून मराठवाड्यातील व राज्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबितो. गेल्या 23 दिवसात राज्यातील 89 शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला आहे. शिंदे व फडणवीस सरकार स्थापन होवून राज्यात 23 दिवस झाले असून या 23 दिवसात शिंदे सरकारने अनेक निर्णय घेतले परंतु यात शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विशेष असा कोणताच निर्णय घेतल्याचे दिसत नाही. यामुळे भविष्यात तरी राज्यासह विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम शिंदे सरकारने राबवावेत अशी मागणी होत आहे.

जिल्हा निहाय्य आकडेवारी
जिल्हा                 आत्महत्या संख्या
औरंगाबाद                   15
बीड                            13
यवतमाळ                    12
अहमदनगर                  07
परभणी                       06
जळगाव                      06
जालना                       05
बुलडाणा                     05
उस्मानाबाद                 05
अमरावती                   04
वाशिम                       04
अकोला                     03
नांदेड                        02
भंडारा-चंद्रपुर             02

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here